दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचे रँगिंग, आ. चंद्रकांत पाटलांची नवोदय विद्यालयात धाव
Bhuswal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या वर्गातील मुलांनी रॅगिंग करीत मारहाण करण्याची गंभीर घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. आमदार चंद्रकांत पाटील रविवारी दुपारी दोन वाजता विद्यालयास भेट दिली मात्र प्राचार्य यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यांनतर आज पुन्हा आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट वि द्यालय गाठून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य खंडारे यांच्याशी या प्रकरणाची सखोल चर्चा केली. तसेच त्यांनी प्रत्यक्षात थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना आश्वस्त केले.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, मंगळवारी 4 ऑक्टोंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जवाहर नवोदय विद्यालयात बारावीच्या वर्गातील मुलांनी दहावीच्या वर्गातील मुलांची रॅगिंग करण्यास सुरवात केली. रॅगिंगमध्ये सुमारे सहा विद्यार्थ्यांना बारावीच्या वर्गातील मुलांनी जबर मारहाण केली. ही मारहाण तब्बल तीन तास म्हणजे रात्री 1.30 वाजेपर्यत सुरू होती. तक्रारकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, माझ्या मुलास खाली झोपवून त्यास अमानुष मारहाण करण्यात आली. त्याच्या तोंडावर चप्पलेने मारहाण केली. पाठीवर सुध्दा जबर मारले आहे. रात्रीच्या वेळी विद्यालयाचे गेट बंद असल्याने रात्री हा प्रकार बाहेर येऊ शकला नाही.
शाळेच्या मैदानावर दुसर्या दिवशी बुधवार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी जमले असता यावेळी प्राचार्य खंडारे यांना विद्यार्थ्यांनी हा प्रकार सांगितला. यावेळी प्राचार्य यांनी याप्रकरणी मुलास झोपेतून उठवून त्याच्या पाठीचा फोटो काढला मात्र, मारणार्या दोन्हींवर कारवाई केली नाही. उलट या प्रकरणाची बाहेर वाच्यता करू नका, नाही तर शाळेचे नाव खराब होईल, तुमचे नुकसान होईल, असे मुलांना सांगण्यात आले. यामुळे झालेल्या प्रकाराची माहिती जखमी असलेल्या मुलांच्या पालकांना सुध्दा सांगण्यात आली नाही, प्रकरण दाबण्याचा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी रविवारी प्राचार्य यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी रविवार असल्याने सुटी असल्याने सोमवारी भेट घेता येईल, असे सांगितल्याने प्राचार्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
पाच दिवसानंतर घटनेचा प्रकार उघडकीस
बारावीतील ज्या मुलांनी मारहाण केली होती, त्या मुलांच्या पालकांनी दहावीतील ज्या मुलास अधिक मार लागला आहे, त्याच्या पालकांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती देत माफि मागितली. आमच्या मुलांकडून चुक झाली आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे जखमी मुलाचे पालकांनी तत्काळ भुसावळ विद्यालय गाठले. मुलाची भेट घेतली. प्राचार्यांशी चर्चा केली. मात्र असा प्रकारच घडला नाही, असे प्राचार्यांनी सांगितले. घटनेच्या पाच दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला. तोपर्यत मुलांवर उपचारही करण्यात आले नसल्याचे पोलिसांना पीडीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.
सात दिवसात अहवाल द्या अन्यथा गुन्हा दाखल होणार
भुसावळ सारख्या लहानश्या गावात रॅगिंगची घटना घडल्याने या गंभीर प्रकरणाची दखल डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी घेतली आहे. जखमी मुलाच्या पालकांची तक्रार अर्ज दिल्यानंतर प्रकरणी प्राचार्य एस.एस.खंडारे यांना त्यांनी लेखी पत्र देत अवघ्या सात दिवसात या प्रकरणाचा लेखी अहवाल पाठवावा, जर अहवाल प्राप्त झाला नाही तर या प्रकरणात तुम्हालाही संशयीत आरोपी केले जाईल, असेही पोलिस उपअधीक्षकांनी बजावले आहे.
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दुपारी दोन वाजता जवाहर नवोदय विद्यालयास भेट दिली मात्र प्राचार्य यांची भेट होऊ शकली नाही. मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे, सोमवारी पुन्हा या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विद्यालयात भेट देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले होते. त्यांनतर आज पुन्हा त्यांनी थेट नवोदय विद्यालय गाठले. त्यांनी या प्रकाराची माहिती जाणून घेतली. त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य खंडारे यांच्याशी या प्रकरणाची सखोल चर्चा केली. नंतर त्यांनी प्रत्यक्षात थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना आश्वस्त केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी हे देखील होते.