⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

Big Breaking : स्वच्छ सर्वेक्षण 2022 : टॉप 100 लिस्टमध्ये जळगाव व भुसावळ!

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा जळगाव आणि भुसावळ शहर टॉप 100 लिस्टमध्ये आले आहेत. या दोन्हीही शहरांना चांगले मानांकन मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण-२०२२च्या नामांकनाची यादी जाहीर करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांमधून सर्वेक्षण करून यातील स्वच्छतेच्या विषयाबाबत रँकींग देण्यात आलेली आहे.

यंदाच्या यादीत १ ते १० लाख लोकसंख्या असणार्‍या शहरांमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन शहरांचा समावेश करण्यात आलाअसून जळगाव शहर हे ८४ व्या स्थानावर आहे. तर याच बरोबर भुसावळ शहर हे ९८व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे यंदा सर्वेक्षणात एकूण ३८२ शहरांना स्थान प्रदान करण्यात आले होते. त्यातून शहराने हे स्थान पटकवले आहे.

जळगाव महापालिकेला यंदा ४२८६.८३ इतके गुण मिळाले आहेत. तर भुसावळ नगरपालिकेला ४१४४.७५ इतके गुण मिळाले आहेत. यामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षणात या दोन शहरांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली आहे. जळगाव महापालिकेत महापौर जयश्रीत महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप मिळाली आहे.