जागतिक रंगभूमि दिवसानिमित्त बालगंधर्व नाट्यगृहात रंगभूमी पूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२३ । रंगभूमी ही अशी जादूई जागा आहे, जिथे काल्पनिक विश्व प्रेक्षकांसमोर मांडलं जातं. कधीकधी माणसाला वास्तवाचा आरसा दाखवण्याचं काम देखील रंगभूमीवरील कलाकृती करतात. रंगभूमीवर कलाकृती सादर करुन कलाकार रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. जगातील सर्व रंगभूमींमध्ये आदानप्रदान व्हावे या हेतूने १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो. आज (दि.२७) मार्चला बालरंगभूमी परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व खुले नाट्यगृहात जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी व चिंतामण पाटील यांच्याहस्ते नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना चिंतामण पाटील म्हणाले की, जागतिक रंगभूमी दिन हा दिवस साजरा करण्याचा निर्णय १९६१ मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने घेतला. यानिमित्ताने दरवर्षी जागतिक रंगभूमी दिनाचा संदेश एखाद्या देशाच्या नाट्य कलावंताकडून दिला जातो. १९६२ मध्ये, फ्रान्सचे जीन कॉक्टो हे आंतरराष्ट्रीय संदेश देणारे पहिले कलाकार होते. पहिले नाटक अथेन्समधील एक्रोपोलिस येथे असलेल्या डायोनिससच्या थिएटरमध्ये घडल्याचे सांगितले जाते. हे नाटक पाचव्या शतकाच्या सुरुवातीचे मानले जाते. यानंतर थिएटर संपूर्ण ग्रीसमध्ये वेगाने पसरले.
त्यानंतर डॉ.हेमंत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, रंगभूमीकडे वळणारी नवी पिढी नवे प्रयोग करायला एकत्र येत आहेत. हौशी तरुण कलाकारांचे ग्रूप ठिकठिकाणी फुलत आहेत. कलेचा आनंद तर त्यांना या नाटकवेडातून मिळतोच पण जीवनाचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत नाटकामुळं शिकता येतं. जुन्या रंगकर्मीनी दिलेली शिकवण आणि नाटकांची परंपरा पुढे वेगळ्या आयामाने पुढे नेण्याचा प्रयत्न आजची तरुणपिढी जोमाने करत आहे.
याप्रसंगी जळगावातील रंगकर्मी प्रा.राजेंद्र देशमुख, पियुष रावळ, अविनाश चव्हाण, योगेश शुक्ल, सचिन चौघुले, आकाश बाविस्कर, किरण अडकमोळ, धनंजय धनगर, गौरव लवंगाळे, अमोल ठाकूर, ज्ञानेश्वर सोनार, कुंदन इंगळे आदी उपस्थित होते.