जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । महाराष्ट्राच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. नवनीत राणा विरोधात आज खार पोलीस ठाण्यात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी (police) रिमांड कॉपीत राणा दाम्पत्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही ही मागणी लावून धरत राणा यांच्यावरील आरोप किती गंभीर आहेत. याची माहिती कोर्टाला दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत राणा दाम्पत्यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला आहे. राणा दाम्पत्यांवर खार पोलीस ठाण्यात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खार पोलीस ठाण्यात आतापर्यंत ३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 2 गुन्हे नवनीत राणा यांच्यावर, तर तिसरा गुन्हा जमावाविरोधात दाखल करण्यात आला आहे. समाजासमाजात तेढ निर्माण केल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला आहे. आता वांद्रे न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, त्यानंतर राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला. त्यावर कोर्टाने येत्या 27 तारखेला त्यांचं लेखी म्हणण्यास मांडण्यास सांगितलं आहे. त्यानंतर या विषयावर 29 एप्रिल रोजी या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिल पर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे.
6 शिवसैनिकांना अटक
विशेष म्हणजे खार येथील राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या ६ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. 600 ते 700 लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला. भादंवि कलम १४३, १४५, १४७, १४९, ३७ (१) आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.