जळगाव लाईव्ह न्यूज । योगेश शुक्ल । महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धा म्हटली म्हणजे हौशी नटमंडळींची दिवाळीच असते. वर्षभरातील केलेल्या चर्चा त्यातून झालेली भांडणे विसरुन ही हौशी रंगकर्मी मंडळी एकत्र येत आपापल्या संघाकडून नाट्य सादरीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. मात्र हौशी नटमंडळींचे नाटक आणि त्याला अडचणी येणार नाहीत असे कसे होईल. अशाच एका गोष्टीतून राज्य नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर माझा चंचूप्रवेश झाला. नेहमीप्रमाणे त्याकाळातील २८ वी राज्यनाट्य स्पर्धा सुरु झाली. मेहरुणच्या जय भवानी शिक्षण मंडळाचे आणखी एक नारायण निकम हे २२ कलावंतांचा संच असलेले नाटक सादर होणार होते. कलावंतांची संख्या जास्त असल्याने, रंगभूषेकरिता चिंतामण पाटील मास्तरांना मदत करायला मी पोहचलो.
नाटक सुरु होण्याआधीची धावपळ सुरु होती. प्रवेशानुसार नट रंगभूषेकरिता उभे होते आणि आम्ही तत्परतेने रंगभूषा करीत होतो. पात्रयोजना मोठी असल्याने, काही कलावंत हे दुहेरी भूमिका करत होते. त्यामुळे आधीच्या प्रवेशातील भूमिका झाली की दुसऱ्या प्रवेशातील भूमिकेनुसार रंगभूषेत आम्ही बदल करत होतो. पहिल्या अंकाचे दोन का तीन प्रवेश झाले होते. पुढील प्रवेशाची तयारी सुरु असतांनाच अचानक लक्षात आले की, त्या प्रवेशात अवघ्या तीन चार वाक्यांचा संवाद असलेला मुलगा आलेलाच नाही. ते संवाद झाल्याशिवाय नाटक पुढे सरकणार नव्हते. त्याबाबत त्या प्रवेशातील कलावंतांमध्ये अस्वस्थता होती. पण प्रयोगाच्या क्षणी कलावंतांमध्ये अशी अस्वस्थता निर्माण होणे म्हणजे ऐन युध्दात आघाडीला जाणाऱ्या सैनिकांनी कच खाण्यासारखे होते.
क्षणार्धात मेकअप करत असलेल्या माझ्याजवळ नाटकाचे दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणारे अरुण सानप आले. योगेश ही भूमिका आता तुला करायची आहे. हे तीन वाक्य आहेत म्हणून तो संहितेचा कागद माझ्या हातात ठेवला. मी ते संवाद वाचले. आधीपासूनच बालनाट्यात भूमिका करत असल्याने आलेल्या प्रसंगावधानाच्या बळावर अवघ्या तीन ते चार मिनिटांच्या कालावधीत ती वाक्ये लक्षात घेऊन तो प्रसंग पार पाडला.
त्यावर्षी जळगाव केंद्रावर ते नाटक पहिले आहे होते. या नाटकातील नारायण निकम यांच्या भूमिकेसाठी अरुण सानप यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. या नाटकानंतर अरुण सानप व त्यांचे बंधू सोमनाथ सानप यांच्या जुळलेला ऋणानुबंध आज ६० व्या राज्यनाट्य स्पर्धेपर्यंत कायम आहे.
– योगेश शुक्ल
आर्ट डिपार्टमेंट हेड,
मृदंग इंडिया असोसिएटस्
मोबाईल – ९६५७७०१७९२