जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नव्या बसेस दाखल होणार असून लवकरच या बसेस जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

एसटी महामंडळाने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी यांसारख्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी नावांच्या बसेस सुरू करून प्रवासी सेवेचा दर्जा उंचावला होता. आता या परंपरेत राजमाता जिजाऊ या नावाचा समावेश होत आहे. नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस आधुनिक ३ बाय २ लेआउटमध्ये खरेदी करण्यात आल्या असून, या बसेस प्रवाशांच्या आरामाचा विशेष विचार करून डिझाइन करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंतच्या बसेसमध्ये सुमारे ४० प्रवाशांची आसनक्षमता असते, तर या नव्या बसेसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करण्याची गरज कमी होणार आहे.

एसटीच्या जळगाव विभागालाही जवळपास २०० राजमाता जिजाऊ बसेस टप्याटप्प्याने मिळणार आहेत. आणि या बसेस प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या जास्त गर्दीच्या मार्गांवर चालवण्याचा परिवहन विभागाचा मानस आहे. मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील विविध आगारातून या बसेस सुरू केल्या जाणार आहेत.






