पावसाचा शेतकऱ्यांना फटका, सोन्यासारखी खरीप पिके आली धोक्यात
Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्याभरात दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी बरसत आहेत, तसेच पुन्हा एकदा ‘ब्रेक के बाद, पावसाळी वातावरण तयार झाले आहे. परिणामी यामुळे कपाशी, ज्वारी, मका या खरीप पिकांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतीत आहेत. दरम्यान, एरंडोल तालुक्यात देखील बुधवारी सकाळपासुन पावसाळी वातावरण आहे.
गणपती विसर्जनानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. अधूनमधून निरभ्र आकाश, सूर्यप्रकाश पडत होता. त्यामूळे ग्रामिण भागातील कपाशी, ज्वारी, मका या पिकांची जोमदार वाढ झाली. पोटरीवर आलेल्या पिकांची लोंब बाहेर पडली. हिरवीगार पिके पिवळी धमक झाली. दोन महिन्यांवर आलेली सुगी डोळ्यासमोर उभी राहिली. याचा आनंद शेतकरी वर्गास झाला. पण पुन्हा दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी बरसत आहेत, तसेच पुन्हा एकदा ‘ब्रेक के बाद, पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.
दरम्यान, आधीच ओली झालेली कपाशीची बोंडे वाळवायला अंगणात टाकत असताना सुर्यदर्शन व ऊन गुडूप झाले. या पावसामुळे पुन्हा कपाशी ओली झाली असून उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच तोंडाशी आलेला घास या आकस्मिक पावसामुळे वाया तर जाणार नाही ना..? अशी चर्चा जनमानसात होत आहे.