जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२४ । राज्यात मागील काही दिवसापासून पावसाचे सावट असून सततच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. खान्देशातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या दाबाला लागूनच जवळपास ७ किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. एकीकडे ऊन आणि सावल्यांचा हा खेळ सुरू असताना दुसरीकडे तुरळक ठिकाणी पाऊस देखील झालाय. आज वातावरणात पुन्हा बदल होऊन जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जाहीर करण्यात आलाय.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात कोसळणार पाऊस
आज शनिवारी पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणासह नाशिक तसेच कोल्हापूरचा घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
उर्वरित विदर्भात शनिवारी दिवसभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव तसेच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय.
कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील आज पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.