जळगाव लाईव्ह न्युज ! ११ सप्टेंबर २०२२ ! जळगाव जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा उकाडा वाढला होता. यामुळे जळगावकर चांगलेच हैराण झाले होता. मात्र आज रविवारी दुपारच्या सुमारास जळगाव शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यासह जिल्ह्यात गणपती विसर्जन दिवसापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. आज हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस आणखी पावसाचे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यापूर्वी राज्यासह जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. मात्र मागील गेल्या दोन तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली. यामुळे पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. या महिन्यात सरासरीपेक्षा १०५ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.