⁠ 
बुधवार, मे 1, 2024

राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा ; जळगावातील हवामान कसं राहणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । एकीकडे महाराष्ट्रातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला असून उष्णतेने नागरिक हैराण झाले. याच परिस्थितीत वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान होत आहे. राज्यात आज म्हणजेच 8 ते 10 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज जळगावात ढगाळ वातावरण राहणार आहे.

रविवारी जळगाव जिल्ह्यासह शहरात दुपारी एक वाजेच्या सुमारास तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर भरदुपारी ढंगाळ वातावरण झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात पारा चाळिशीपार गेला होता. त्यामुळे उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. रविवारी ढगाळ वातावरण असल्याने किंचित दिलासा मिळाला, पण तापमान ४० अंशांवर होते. ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर १२ एप्रिलपर्यंत पुन्हा तापमान ४० अंशांपुढे जाण्याची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

राज्यातील या भागात पावसाचा इशारा
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात १२ तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पासवाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.