जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असून काही ठिकाणी मात्र पावसाचा जोर कायम आहे. येत्या १७ जुलैपर्यंत जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तर आज हवामान विभागाने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात १३ जुलै राेजी संततधार पाऊस झाला. पहाटे ३.३० वाजेपासून सुरू झालेली संततधार १४ जुलै राेजीही दिवसभर सुरूच हाेती. या काळात जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये सातपुडा पर्वतरांगेपासून जवळ असलेल्या तब्बल १५ महसूल मंडळांमध्ये ५० मिमीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याची नाेंद करण्यात आली. त्या तुलनेत दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी हाेते. दरम्यान, गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ११५ मिमी पाऊस झाला हाेता, यंदा मात्र १४ जुलै पर्यंतच १३३.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे.
आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू
दरम्यान, यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळाली. यामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ७,९६३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. राज्यात पावसामुळे एकूण १४ एनडीआरएफ टीम आणि ६ एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.