⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Rain Alert : दाेन दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ; आज यलो अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ जून २०२२ | जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला असला तरी अद्याप पावसाचा जाेर कमी आहे. 22 जूनपासून राज्यातील पर्जन्यमानात बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी दोन तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली. येत्या दाेन दिवसांमध्ये जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जेनेसह पाऊस हाेणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला.

यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा हवामानाचा अंदाज फोल ठरत दोन दिवस उशिराने मान्सून दाखल झाला होता. त्यापूर्वी जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मान्सून देखील चांगला बरसणार असं वाटत होता. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर चार ते पाच दिवसात तो खान्देशात दाखल झाला होता.

मात्र जळगावकडे मान्सून सुरुवातीलाच पाठ दाखविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, 22 जूनपासून राज्यातील पर्जन्यमानात बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातल अनेक ठिकाणी मागील तीन चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सायंकाळी जळगाव शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याना सुरुवात केली आहे.

तर जिल्ह्यातील काही ठिकाणी अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी 75 ते 100 मिमी पावसाची गरज आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे सुरवात झाली असली तरी अपेक्षित पाऊस झाल्यावरच पेरणी कामांना गती येणार आहे.