बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

राज्यात मान्सून दाखल! मात्र जळगावातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, ‘या’ तारखेपासून मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । अनेक दिवसापासून रखडलेला मान्सून पाऊस अखेर राज्यात दाखल झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा सुखावला आहे. दरम्यान, राज्यातील इतरत्र पाऊस होत असला तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाहीय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. अशातच जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यातील पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हेच वातावरण उत्तर महाराष्ट्रात तयार होणार असून जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. उद्या म्हणजेच २६ जून रोजी दुपारनंतर संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यापूर्वी काल शनिवारी जिल्ह्यातील पारोळा, रावेर तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली मात्र जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नसून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

यंदा जून महिना संपत आला तरी देखील पाऊस झाला नाहीय. यामुळे अद्यापही पेरणी न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात २३ दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी काहीअंशी पेरण्या झाल्या होत्या; मात्र यंदा पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या आहे.

तापमानाचा पारा घसरला?
दरम्यान, मागील काही दिवसापासून जिल्ह्यात ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाचे ढग दाटून येत आहे. यामुळे शनिवारी तापमानाचा पारा ३६ अंशावर आला होता.

राज्यातील या भागाला अलर्ट जारी?
दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रीय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सूनरेषा अलिबागपर्यंत पुढे सरकल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मान्सून सक्रीय झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये पावसाने दमदार उपस्थिती लावली. भारतीय हवामान विभागाने मुंबईतही रविवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. रायगड जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.