⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२२ । मागच्या काही दोन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. उद्या हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

एकीकडे सुरू झालेली थंडी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गायब झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची खरीप हंमातील पीके काढणीस आलेली असताना, दुसरीकडे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नोव्हेंबर महिन्यांच्या सुरूवातीला राज्यातील काही भागात (Weather Updates) थंडी पडण्यास सुरूवात झाली होती. हवेतील गारठा वाढल्याने आता कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज शेतकरी लावत होते. मात्र, महिन्याच्या सुरूवातीलाच पडलेली थंडी शेवटच्या आठवड्यात गायब झाली.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे अचानक थंडी कमी झाली आणि उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. अशात आता राज्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन खरीपाची पिके काढणीला आली असताना, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.