⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नवरात्रोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरणार ; जळगावला पुढचे चार दिवस पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । सध्या देशात परतीच्या पावसाची चाहूल लागली असली असून त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरलं जाणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुसार आज शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातही ऑक्टोबरपर्यंत पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील चार दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच जळगाव जिल्ह्याला आजपासून चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. काल गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यापूर्वी जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर जुलै, आगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात दमदार हजेरी लावली. सध्या परतीचा पाऊस सुरु असून जिल्ह्याला या काळात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.