जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२५ । भारतात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण स्वस्त, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास म्हणून बहुतांश जण रेल्वेनं प्रवास करतात. मात्र अनेकवेळा कन्फॉर्म तिकीट मिळत नाही. त्यात वेटिंग तिकीटाची यादीला पाहून अनेकवेळा वैताग येतो. मात्र यातच रेल्वेनं वेटिंग तिकीटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे तिकीट कन्फर्म होणार की नाही प्रवास करायचा की नाही या अनिश्चितेतून सुटका होणार आहे.

भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वेटिंग तिकिटांची कमाल मर्यादा निश्चित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा बदल १६ जून २०२५ पासून लागू झाला आहे. रेल्वे बोर्डाच्या नवीन सूचनांनुसार, आता स्लीपर, थर्ड एसी (३एसी), सेकंड एसी (२एसी) आणि फर्स्ट एसी (१एसी) कोचमध्ये वेटिंग तिकिटांची मर्यादा एकूण बर्थच्या २५% पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. तिकीटांना मर्यादीत वेटींग दिल्याने तिकीट कन्फर्म होण्याची संधी अधिक असणार आहे.

जानेवारी 2013च्या नियमानुसार, आधी वेटिंगची मर्यादा AC1 मध्ये 30, AC2 मध्ये 100, AC3 मध्ये 300 आणि स्लीपरमध्ये 400 तिकीटांपर्यंत होती. अनेकवेळा तिकीट तर बुक व्हायचे परंतू शेवटच्या क्षणी कन्फर्म होत नसायचे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागायचा. कन्फर्म तिकीटांशिवाय अनेक वेटिंग तिकीट वालेही आरक्षित डब्यात घुसखोरी करतात. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. आणि मुळ आरक्षित प्रवाशांना अडचण होत असते.
आता रेल्वेचा फोकस ‘क्वालीट बुकींग’वर राहणार आहे. जो तिकीट बुक झाली तर प्रवासाची हमी देखील देईल… रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की नव्या नियमांमुळे बेकायदेशीर प्रवाशांची डब्यातील घुसखोरी कमी होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व झोनल रेल्वेना हे परिपत्रक पाठवून त्यास लागू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक झोन त्यांच्या क्षेत्रातील बुकींग आणि कॅन्सलेशनच्या ट्रेंडच्या आधारे हे निश्चित करणार की ट्रेनमध्ये किती तिकीटे वेटिंगची द्यायची. म्हणजेच हा नियम लवचिक असणार आहे. परंतू २५ टक्क्यांच्यावर वेटिंगची तिकीटे दिली जाणार नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या बदलामुळे प्रवाशांना तिकीट कन्फर्म होईल की नाही हे आधीच कळेल. यामुळे अनावश्यक वाट पाहणे आणि तिकीट कन्फर्मेशनच्या अनावश्यक अपेक्षा दूर होतील. कन्फर्म तिकिटाची शक्यता वाढेल आणि प्रवासाची तयारी करणे सोपे जाईल.
नवीन नियम त्यांना लागू होणार नाही
भारतीय रेल्वेचा नवीन वेटिंग तिकिट नियम अशा प्रवाशांना लागू होणार नाही जे सवलतीच्या तिकिटांवर प्रवास करतात किंवा ज्यांची तिकिटे सरकारी वॉरंटद्वारे जारी केली जातात. याचा अर्थ असा की जर एखाद्या अपंग प्रवाशाने सबसिडीचे तिकीट बुक केले तर त्याला ही २५% प्रतीक्षा मर्यादा लागू होणार नाही. त्याचप्रमाणे, लष्करी कर्मचाऱ्यांना दिलेल्या लष्करी वॉरंटवर हा नियम लागू होणार नाही.












