
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नागरिकांमध्ये नशामुक्ती, सायबर फसवणूक तसेच नागरिकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ठिकाणी जनजागृतीपर बॅनर लावण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या जनजागृती मोहिमेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, नशेपासून दूर राहण्याचे आवाहन, सायबर फसवणुकीपासून बचाव, ऑनलाइन व्यवहारातील सुरक्षितता तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत.
जळगाव पोलीस आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे जळगाव शहरवासीयांपर्यंत नशामुक्ती, सायबर सुरक्षितता आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश पोहोचविण्यात येणार आहे.
यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचे अध्यक्ष रोहित आहुजा, सचिव धनराज कासट, युवराज परदेशी, योगेश सांखला, पूनम वर्मा, सुमित डॅनियल, तुषार भामरे, विराज पटेल, तरुण ऐदासनी, सागर वाणी, विनीत हेमनानी, रजत भोळे, प्रकाश मुळे, रितेश छाजेड यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नागरिकांनी या जनजागृती मोहिमेला सहकार्य करून नशामुक्ती, सायबर सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





