जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने तयार केलेले रेल्वे कोविड आयसोलेशन कोच जळगाव जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी माजी महापौर, नगरसेविका भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री व रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, माजी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद असून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.
महापौर भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री ना.हर्ष वर्धन, रेल्वे मंत्री ना.पियुष गोयल, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
महापौरांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालये फुल झाली असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने फिरफिर करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नवीन रुग्णालये आणि इमारती कोविड अधिग्रहित केली जात असली तरी ती कमी पडू लागली आहे. देशातील कोविड रुग्णांना तात्काळ सुविधा मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने रेल्वे विभागामार्फत देशभरात ४०० रेल्वे कोचचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आले आहे.
जळगाव शहरात देखील कोविड रुग्ण वाढत असल्याने काही कोच जळगावला पाठविण्यात यावे किंवा जिल्ह्यातील प्रमुख आणि रेल्वेची सुविधा असलेल्या तालुक्यांसाठी ते कोच राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरून रुग्णांना तात्काळ उपचार देणे शक्य होईल. जळगाव जिल्ह्यात कालपर्यंत १ लाख ६४१ रुग्ण आढळून आले असून आजपर्यंत १७७६ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. अनेक तरुण रुग्णांचा देखील मृतांमध्ये समावेश असून दररोज सरासरी १५ रुग्णांचा मृत्यू होत आहे. एखाद्या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ आणले असता बेड नसल्याने वाट पाहत ताटकळत थांबावे लागल्याचे प्रकार घडत आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान ४०-४५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. जळगाव जिल्ह्यासाठी वातुनुकूलित आयसोलेशन कोच असणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता जळगाव रेल्वे स्थानकावर किंवा इतर तालुक्याच्या ठिकाणी रेल्वे आयसोलेशन बेड उपलब्ध करून घ्यावे किंवा गंभीर परिस्थितीसाठी राखीव करून ठेवावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रेल्वे आयसोलेशन कोचची वैशिष्ट्ये
रुग्णांसाठी २० बेडची व्यवस्था, प्रत्येक डब्यात डॉक्टरांसाठी एक केबीन, ऑक्सिजन सिलिंडर लावण्याची सोय, आंघोळीसाठी बाथरूम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक डब्यात पॅरामेडीकल स्टाफ स्थानिक प्रशासनाने नियुक्त करायचा आहे.
खा.उन्मेष पाटील यांचे आश्वासन
माजी महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत खा.उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली. खा.पाटील यांनी केंद्र शासनाकडे रेल्वे आयसोलेशन कोच बाबत पाठपुरावा करून जळगाव जिल्ह्यासाठी ते कोच आणणारच असे आश्वासन दिले आहे.