⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ठाकरे गट महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

जळगाव लाईव्ह न्यूज| ४ ऑगस्ट २०२३। भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ८ वर्षीय चिमुकलीवर एकांतात बोलावून संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत तिचा दगडाने खून केला. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह गोठ्यातील चाऱ्याच्या कुट्टीत आढळून आला होता. तिच्यावर अत्याचार प्रयत्न करत खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीसांनी या गुन्ह्यातील संशयिताला अटक करण्यात आली.

दरम्यान चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात जलद न्यायालयात खटला चालविण्यात यावा, सहा महिन्याच्या आत निकाल देवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, मयत मुलीच्या कुटुंबियांना तातडीने राज्यशासनाकडून आर्थीक मदत देण्यात यावी यासह इतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता देण्यात आले. याप्रसंगी ठाकरे गटाच्या महिला महानगराध्यक्षा मनिषा पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.