जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या यंदाच्या युवारंग महोत्सवासाठी नंदुरबारच्या हिरालाल चौधरी महाविद्यालयाने संयोजकत्व स्वीकारण्याचा प्रस्ताव महाविद्यालयास दिला आहे.

अद्याप हा एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला आहे. महोत्सवासाठी नियुक्त समिती या ठिकाणी जावून पाहणी करणार आहे. ओमायक्रॉन संसर्गजन्य स्थितीत सुधारणा झाल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या,दुसऱ्या आठवड्यात युवारंगचे नियोजन शक्य आहे. डिसेंबर अखेरपर्यंत यंदा कोणत्याही महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन, तयारी सुरु नसल्याचे चित्र दिसत आहे. विद्यापीठातर्फे दरवर्षी होणारा युवारंग महोत्सव गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही होईल की नाही, याबाबत महाविद्यालयीन तरूणाईमध्ये तर्कवितर्क सुरु आहे. युवारंगच्या आयोजनाबाबत विद्यापीठाकडून महाविद्यालयांना संयोजकत्वाचे पत्र पाठवूनही कोणत्याही महाविद्यालयाने त्यास तयारी दर्शवली नव्हती; मात्र नंदुरबार येथील हिरालाल चौधरी विनाअनुदानित महाविद्यालयाने युवारंग महोत्सवाचे संयोजकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार युवारंग नियोजन समिती पुढील आठवड्यात या महाविद्यालयाची पाहणी करणार आहे. यात विद्यार्थांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था, रंगमंच, प्रशस्त हॉल याची पाहणी करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
फेब्रुवारीत महाेत्सव हाेण्याची शक्यता : सद्या हिवाळी परीक्षा सुरु आहेत, जानेवारीच्या मध्यंतरापर्यत त्या सुरु राहतील. या काळात महोत्सवाचे आयोजन करता येणे शक्य नाही. परीक्षा आटोपल्यानंतर याचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे महोत्सवासाठी जागेची निश्चिती झाल्यानंतरही महाविद्यालयातील विद्यार्थांना सराव करण्यासाठी काही दिवसांचा अवधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन फेब्रुवारीच्या मधल्या आठवड्यात शक्य असल्याचेही विद्यापीठाच्या विश्वसनीय सूत्राने सांगितले.
हे देखील वाचा :
- जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप’ भरती मेळाव्याचे आयोजन; नोंदणी कशी आणि कुठे कराल
- NEET-PG च्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा
- 11वी प्रवेश प्रक्रियेला आता ‘सोमवार’चा मुहूर्त ! प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर
- जळगाव जिल्ह्यात डिप्लोमाच्या ‘एवढ्या’ जागा उपलब्ध
- 10वीत नापास झालात? टेन्शन घ्यायची गरज नाही..! पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर