जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीसह महाविकास आघाडीमधील पक्षातील काही नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले असून यामुळे त्यांच्यावर पक्षांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशातच आता जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील बंडखोरांवर कारवाईसाठी प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे.
यांच्यावर होणार कारवाई?
अजित पवार गटाने बंडखोरी करणारे पाचोन्याचे माजी आमदार दिलीप वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष अमित पाटील, पारोळ्याचे डॉ. संभाजीराजे पाटील या बंडखोरांसह त्यांना मदत करणारे एरंडोल व पारोळा येथील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.
पाचोन्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या कोट्यातून जिल्हा नियोजन मंडळावर घेण्यात आलेले आहे. वाघ यापूर्वीही कधी शरद पवार गटात, तर कधी अजित पवार गटात राहिले होते. एरंडोल-पारोळा मतदारसंघातून डॉ. संभाजी राजे पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. याशिवाय तिघंही बंडखोरांना पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी मदत करीत आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.