३ मे हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. समाजात होणारे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारासह चुकीच्या घटनांवर परखड मत मांडणार्या पत्रकारांसाठी ३ मे हा दिवस निश्चितपणे महत्वाचा ठरतो. ३ मे हा दिवस सरकारांना वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचा आदर करण्याच्या गरजेची आठवण करून देतो. प्रेस स्वातंत्र्य आणि व्यावसायिक नैतिकतेच्या मुद्द्यांवर माध्यम व्यावसायिकांमध्ये चिंतन करण्याचा हा दिवस आहे.
या दिवसाचा इतीहास मोठा रंजक आहे. १९९१ मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहिमेला सुरुवात केली. ३ मे १९९१ रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९९२ सालापासून ३ मे हा दिवस ‘प्रेस फ्रिडम डे’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. १९९३ मध्ये ‘युनेस्को’ने ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यास मंजुरी दिली.
आज जगभरात काही नामधारी पत्रकार आहेत, त्यातील काही सुपारी बहाद्दर म्हणून देखील ओळखले जातात. ठरवून सुपारी घेतल्यासारख्या एखाद्याबद्दल खोटी बातमी, लेख लिहून दुसर्या दिवशी प्रसिद्धी मिळवणे किंवा त्यातून आर्थिक हेतू साधणे, असे गैरप्रकार देखील होतात. अलीकडच्या काळात ‘चाय बिस्कुट’ पत्रकार हा शब्द देखील चांगलाच प्रचलित झाला आहे. मात्र याच वेळी काही पत्रकारांना तत्त्वांशी, कर्तव्यांशी आणि विचारांशी कोणतीही तडजोड न करता पत्रकारितेचे व्रत स्विकारले आहे. अशी पत्रकारिता करणारेही पत्रकार आज जगात आहेत. जे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, समाजात घडणार्या चुकीच्या बाबी, अन्याय अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचाराविरोधात लिहितात, बोलतात. त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मौल्यवान आहे. त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ३ मे या ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना’चे महत्त्व मोठेच आहे.