⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कोरोनाशी सामना करण्यासाठी जिल्ह्यात अशी आहे आरोग्य यंत्रणेची तयारी

जळगाव लाईव्ह न्यूज | 28 डिसेंबर 2022 | गेली दोन वर्ष जगभरात धुमाकूळ घातलेला कोरोना (Corona) आता काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोना (Covid -19) रुग्णसंख्येत घट झाली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, अशातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. यापार्श्‍वभूमीवर भारतातही सतर्कता बाळगली जात आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ५,७५३ बेड तयार करण्यात आले असून १७ ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या बाबतीत जळगाव जिल्हा सुरुवातीला संपूर्ण देशात हॉटस्पॉट म्हणून चर्चेला आला होता. आजमितीस जिल्ह्यात तब्बल १ लाख ५२ हजार ०९७ कोरोना बाधितांची नोंदी झाली असून त्यापैकी १ लाख ४९ हजार ५०५ रुग्ण बरे झाले असून २ हजार ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाने प्रचंड कहर केला होता. मात्र प्रशासनाने उपाययोजनांबाबत घेतलेली गंभीर दखल आणि त्याला जनतेने दिलेली साथ याचे सकारात्मक परिणाम दिसून जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला होता.

जर कोराना परतला तर त्याचा सामना करण्यासाठी जळगाव जिल्हा पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोरोना कक्ष सुरू करावा यांसह कोरोना रुग्णांवर उपचारासाठीची औषधे, स्टाफची नियुक्ती करावी, जिल्ह्यात रुग्ण वाढले, तर त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी यंत्रणेने सज्ज असले पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे.

अशी आहे आरोग्य यंत्रणेची तयारी
जिल्ह्यात ७१ ठिकाणी हॉस्पिटल आहेत. त्यात शासकीय १७, खासगी ५४ आहेत. कोरोना रुग्णांसाठी एकूण पाच हजार ७५३ बेड तयार करण्यात आले आहेत. त्यात आयसोलेशन, ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा सामावेश आहे. ८७६ डॉक्टर असून, ११०२ नर्सेस आहेत. ८६ ठिकाणी रुग्णवाहिका आहेत. आरटीपीसीआर किट ६ हजार ९३५ आहे. २२ हजार २५७ पीपीई किट आहेत. नेब्युलायझर २९६ आहेत. ऑक्सिमीटर ६३० आहेत. ऑक्सिजन कान्सेंट्रेटर ४३६, ऑक्सिजन सिलिंडर २३४८ आहेत. ऑक्सिजन निर्माण करणारे १७ प्लांट, एलएमओ प्लांट २२ व गॅस पाइपलाइन ६७ ठिकाणी आहे.

आठ लाख पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर नियत्रण मिळविण्यात यश मिळाल्याच्या मागील कारणाबाबत विचार केला तर दुसर्‍या लाटेदरम्यान प्रशासनाने ब्रेक द चेन मोहीम राबविली होती. यामध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन यांचा वापर करण्यासंदर्भात करण्यात आलेली जनजागृती आणि जिल्ह्यातील आठ लाखापेक्षा जास्त लोकांना करण्यात आलेले लसीकरण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं.