जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । काही वर्षापूर्वी पोलिसांना त्रास देण्याचे प्रकार नेहमी होत होते आता तसाच एक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी एका मोबाईल क्रमांकावरून अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांना अश्लील मेसेज पाठविण्यात आला. मेसेजमध्ये एका महिला पोलिसाचा क्रमांक असल्याने तिला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
मंगळवारी एकापाठोपाठ अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल खणखणले आणि त्यांच्या मोबाईलवर अश्लील शिवीगाळ व मजकूर असलेले संदेश येऊन झळकले. संदेश पाठविणारा अज्ञात असला तरी त्यात जळगावातील एका महिला पोलिसाचा मोबाइल क्रमांक दिला आहे. जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सर्वाधिक संदेश आलेले आहेत. तसेच काही पत्रकारांचा पण त्यात समावेश आहे.
सर्वांनी हा प्रकार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व संबंधित महिला पोलिसाला लक्षात आणून दिला. गवळी यांनी याबाबत महिलेला सायबर पोलिसात तक्रार देण्यास सांगितले असून नोंद करण्यात आली आहे. मेसेज करणारा नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजते. ज्या क्रमांकावरून मेसेज आला त्यावर संपर्क साधला असता त्याने फोन घेतले नाही आणि नंतर मोबाईल क्रमांक बंद येत होता.