⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | विशेष | जळगावात येताच सुरेशदादांची राजकीय गुगली!

जळगावात येताच सुरेशदादांची राजकीय गुगली!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहराच्या राजकारणात तब्बल २५ वर्ष एकहाती सत्ता राखणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना नुकतेच घरकुल घोटाळा प्रकरणात नियमीत जामीन मिळाला आणि ते जळगावात आले. तब्बल १० वर्षांनी सुरेशदादा जैन (Suresh Jain) जळगावात आले मात्र ते जळगावात नसताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी तयारी सुरु केली होती. गुडघ्याला बाशींग बांधून असलेल्या सर्वांच्या तोंडाला कुलूप लावणारी एकच गुगली सुरेशदादा जैन यांनी टाकली आणि सर्वच अवाक् झाले.

जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेते प्रभावशाली आणि देशाच्या राजकारणात मोठे वजन असलेले आहेत. एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर यांनी राजकारणात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. जिल्ह्यातील नेत्यांच्या यादीत या पंचमंडळीचा समावेश होत असला तरी आज देखील जळगाव शहराच्या राजकारणात एकच नाव घेतले जाते ते म्हणजे सुरेशदादा जैन. जळगावात तब्बल २५ वर्षापेक्षा अधिक काळ या नावाने आपले अधिराज्य गाजविले. अधिराज्य म्हणण्यापेक्षा शहराच्या निर्मितीचा पायाच यांच्यापासून ठेवला गेला. २०१० पर्यंत विकसित झालेल्या जळगावचा प्रत्येक भाग सुरेशदादा जैन यांच्या समोर आणि त्यांच्यामुळेच रोवला गेला.

जळगावात कार्य करताना सुरेशदादा जैन यांनी गुंडगिरी कमी करीत अनेकांना सक्रीय राजकारणात आणून ‘व्हाईट कॉलर’ केले. पक्षात आणि जळगाव नपा, मनपा, बाजार समितीसह विविध समित्यांवर वेगवेगळी पदे देत जबाबदाऱ्या सोपविल्या. एका अल्पसंख्याक समाजातून असलेले सुरेशदादा जैन यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्व सुरळीत सुरु असतांना अचानक सुरेशदादांच्या वैभवाला नजर लागली आणि घरकूल घोटाळ्यासह इतर घोटाळे बाहेर आले. जळगाव शहरात विकासकामे करताना झालेल्या अनियमिततेचा भांडाफोड झाला आणि घोटाळ्याचे गुन्हे दाखल झाले.

काही वर्ष धूळखात पडलेल्या गुन्ह्यांना अचानक गती मिळाली आणि सुपरफास्ट तपास करीत मुख्य संशयीत म्हणून नाट्यमयरित्या सुरेशदादा जैन यांना अटक झाली. आज ना उद्या जामीन मिळेल अशी अपेक्षा लावून असलेल्या समर्थकांनी अडचणी वाढवल्या आणि जामीन लांबला. जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा अनेकदा अर्ज करून देखील जामीन मिळाला नाही आणि न्यायालयाने सुनावणी घेऊन शिक्षा जाहीर केली. सुरेशदादा जैन यांच्यासह जळगाव शहराच्या सक्रीय राजकारणात मोठे नाव असलेले तत्कालीन नगराध्यक्ष, माजी पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, नगरसेविका अशा अनेकांना शिक्षा सुनावली गेली. इतरांना जामीन मिळाला मात्र मुख्य संशयीत असलेल्या सुरेशदादा जैन यांना जामीन नाहीच.

एक मोठा काळ कारागृहात घालविलेले सुरेशदादा जैन यांच्या जामीनाची आशा धूसर होत असतांना मोदी लाट आली आणि जळगावच्या राजकारणाचे चित्रच पालटले. भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सुरेश भोळे (राजुमामा) यांनी दादा राजचा अस्त करीत स्वतःचा झेंडा फडकाविला. मोठ्या मताधिक्क्याने आ.भोळे विजयी झाले. विधानसभा आपल्या ताब्यात आली खरी पण जळगाव मनपा मात्र अजूनही दूर होती. दुसऱ्यांदा देखील आ.राजूमामा भोळे यांनी मोठा विजय मिळवला. इकडे जळगाव मनपाची निवडणूक आली. सुरेशदादा जैन जळगावात नसल्याने संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी खेळी खेळली. ऐनवेळी आघाडी न करता स्वबळाचा नारा दिला. दिवसरात्र ७ शिवाजीनगरला असणारे सुरेशदादांचे समर्थक गळाला लावले. जळगाव मनपावर भाजपचा एक हाती झेंडा फडकला.

सुरेशदादा जैन यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळालेला असल्याने ते मुंबईतच होते. जळगावात येण्याची परवानगी नसल्याने सक्रीय राजकारणापासून ते लांबच होते. सुरेशदादा जैन यांच्या सत्तेचे वजीर प्रदीप रायसोनी यांनी देखील जळगावात असले तरी राजकारण किंवा जाहीर सामाजिक कार्यक्रमापासून लांबच राहणे पसंत केले. मुख्य नेते बाहेर असल्याने जळगावात अनेकांना आमदारकीचे वेध लागले, त्यात दादा गटाचे चेहरेच अधिक आहेत. भाजपात फार काही नावे चर्चेत नसली तरी शिवसेनेत मोठी यादीच आहे. आजी-माजी महापौरांपासून इतर देखील काही चेहरे चर्चेत आहे.

न्यायालयाने शिक्षा सुनावलेली असल्याने सुरेशदादा जैन हे निवडणूक लढवू शकणार नसल्याचे माहिती असल्याने इतरांनी तयारी सुरु केली. नियमीत जामीन मिळाल्यावर सुरेशदादा जैन यांचे जळगावात आगमन झाले आणि समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सुरेशदादा जैन जळगावात येणार असल्याचे समजतातच अनेकांचे संपर्क कार्यालय ७, शिवाजीनगर झाले. ७ दिवसांच्या कार्यकाळात सुरेशदादा जैन यांना सर्वपक्षीय नेते मंडळी आणि समर्थक येऊन भेटून गेले. इतकचं काय तर राजकीय कट्टर वैरी समजले जाणारे आ.एकनाथराव खडसे यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

जळगावात आल्यावर पहिल्याच दिवशी माध्यमांनी अपेक्षीत असा प्रश्न सुरेशदादा जैन यांना विचारला, ‘तुमचा पुढील राजकीय वारसदार कोण?’. सुरेशदादा जैन जळगावात नसले तरी त्यांना जळगावात काय सुरु आहे याची सर्व खबरबात होती. अतिशय शांततेत सुरेशदादा जैन यांनी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाला पसंती दर्शवली. आपल्या उद्योगाचा व्याप सोडून अशोक जैन राजकारणात येणार की नाही? हा पुढचा प्रश्न असला तरी आज मात्र या उत्तराने अनेकांना विचार करायला भाग पाडले. अशोक जैन यांचे नाव समोर आल्याने इतरांकडून त्याला फारसा विरोध होणार नाही, शिवाय आगामी वर्षभर तरी कुणाकडून विचारणा होणार नाही हे दादांना चांगलेच माहिती आहे. सुरेशदादा जैन यांची गुगली यशस्वी ठरली. अशोक जैन यांनी देखील त्यावर काही मत व्यक्त केले नाही. राजकारणात येणार की नाही? यावर त्यांचे मनोगतच समोर आले नसल्याने अद्याप सस्पेन्स कायम आहे.

सुरेशदादा जैन यांनीच राजकीय वारसदार जाहीर केला असल्याने आता त्याला विरोध करायची हिम्मत कुणातच नाही. शिवाय अशोक जैन यांचे सर्वपक्षीय नेते मंडळीसोबत सलोख्याचे संबंध असल्याने इतरांकडून देखील त्याला विरोध होणार नाही हे निश्चित. सुरेशदादा जैन यांनी अशोक जैन यांच्या नावाला पसंती दिली असली तरी ते विधानसभा लढविणार, विधान परिषदेवर जाणार की राजकारणात येणारच नाही असे तर्कवितर्क लावण्यात भावी आमदार व्यस्त झाले आहे. आमदारकीच्या शर्यतीत सुपरफास्टच्या वेगाने निघालेली मंडळी सध्या पसेंजरच्या वेगाने मार्गक्रमण करू लागले आहे. जळगावात एक आठवडा होत नाही तोच वैद्यकीय कारणास्तव सुरेशदादा जैन यांना पुन्हा मुंबईला परतावे लागले. ते पुन्हा जळगावात येईपर्यंत तरी इतर इच्छुक आणि राजकीय विश्लेषक चूप असणार.

सुरेशदादा जैन यांनी टाकलेली गुगली यशस्वी ठरली तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते एखाद्याचे नाव पुढे करतील पण तोवर जळगाव मनपा पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी कोण-कोण सोबत उभे राहणार? हे देखील ते पाहतील. आगामी काही महिन्यात जळगाव शहर मनपाची निवडणूक येऊ घातली असून इतर देखील काही निवडणुका जिल्ह्यात आहे. सुरेशदादा जैन गटातील चेहरे पुन्हा कुठपर्यंत मजल मारतात आणि भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस शिवाय शिवसेनेचा दुसरा गट कशी टक्कर देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.