⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

एकेकाळचा काँग्रेसचा गड आज आहे भाजपचा बालेकिल्ला; वाचा जळगाव जिल्हा आणि भाजपा

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९८५ पर्यंत जळगाव जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाचे अनभिषिक्त साम्राज्य होते. जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मधुकरराव चौधरी यांच्यापासून ते प्रतिभाताई पाटलांपर्यंत अनेक मातब्बर काँग्रेस नेते या जळगाव जिल्ह्यात होऊन गेले.१९३५ साली काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशहन हे जळगाव जिल्हात झाले होते. यामुळे साहजिकच जिल्हात काँग्रेसचे वर्चस्व राहणारच होते. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असल्याने जळगाव काँग्रेस बळकट होती किंबहुना काँग्रेसचा जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला होता.मात्र १९८५ पासून परिस्थिती बदलत गेली. ती इतकी कि हाच जळगाव जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, संदीप पाटील हे काही नेते सोडले तर जिल्हात काँग्रेस आहे का ? असा प्रश्न पडतो.एकेकाळचा काँग्रेसचा गड आज भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.

१९८५ नंतर जिल्ह्यात उमलले ‘कमळ’
१९८५ मध्ये महाराष्ट्रात शरद पवारांची समाजवादी काॅंग्रेस, भारतीय जनता पार्टी, जनता दल, शेकाप या पक्षांनी पुलोद आघाडी करून काॅंग्रेस च्या विरोधात निवडणूक लढवली होती.
जळगाव जिल्ह्यात भाजपा च्या वाट्याला रावेर आणि जामनेर हे दोन विधानसभा मतदारसंघ आले होते. रावेर मधून डाॅ. गुणवंतराव सरोदे तर जामनेर मधून डाॅ. सुरेश पाटील यांनी निवडणूक लढवली होती या पैकी डॉ सरोदे हे निवडून आले तर जामनेर मधून निवडणूक लढवलेले सुरेश पाटील हे पराभुत झाले होते. त्यानंतर अमळनेर मध्ये अग्रवाल या भाजपा विचारधारा असणाऱ्या कुटुंबाचे प्रभुत्व वाढू लागले होते. चाळीसगाव मध्ये देखील पूर्णपात्रे कुटुंब भाजपासाठी काम करत होतं. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये डॉक्टर बाबा फडके हे भाजपासाठी काम करत होते. हा काय भाजपाच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीचा काळ होता.

१९९० साली झाली खडसेंची एंट्री
१९९० चाली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी एकत्रित येऊन निवडणुका लढवण्याचे ठरवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे नेते प्रमोद महाजन यांच्या मुळे हिंदुत्वासाठी ही युती पुढे आली. याच वेळी जळगाव जिल्हयात सेना भाजप मिळून १२ जागा लढवण्यात आल्या ज्यापैकी दोन जागा या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. ईश्वर जा??? हे चाळीसगाव मधून तर एकनाथराव खडसे हे मुक्ताईनगरमधून निवडून आले.

१९९५ साली गिरीश महाजन झाले आमदार
१९९५ साली आत्ताचे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांची भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय राजकारणात आमदार म्हणून पहिल्यांदा निवड झाली. ते जामनेर मधून निवडून आले होते. १९९५ साली भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार जळगाव जिल्ह्यात निवडून आले. ज्यामध्ये गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, अरुण पाटील, साहेबराव भोळे, बी.एस.आबा या पाच आमदारांचा सहभाग होता.

१९९९ साली हरिभाऊ जावळे यांची इंट्री
१९९९ साली देखील भारतीय जनता पक्षाचे ५ आमदार निवडून आले होते. रावेरमधून अरुण पाटील यांचा पराभव झाला होता मात्र भारतीय जनता पक्षाचा येत्या काळातला एक मोठा चेहरा असलेले हरिभाऊ जवळे हे ९९ साली पहिल्यांदा यावल मतदारसंघांमधून निवडून आले.

खऱ्या अर्थाने १९९९ साल हे भारतीय जनता पक्षाचं उभारणीचं वर्ष होतं कारण भारतीय जनता पक्षाने जळगाव जिल्ह्यात १९९९ झाली जी मुसंडी मारली त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ९९ सालापासून ते आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आमदारांची संख्या देखील आज ७ आहे. गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, हरिभाऊ जावळे यांनी पक्षासाठी आपल्या परीने योगदान देण्याचे प्रयत्न केले.

भाजपाचे तत्कालीन नेते एकनाथराव खडसे, उत्तमराव पाटील, गिरीश महाजन, गुणवंतराव सरोदे, सुरेश पाटील यांनी एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे प्रत्येक घराघरात जाऊन भारतीय जनता पक्षाचा विचार पसरवण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये ते पुढे यशस्वीही झाले.

एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील घराघरात भारतीय जनता पक्ष फक्त पोहोचलाच नाही तर जळगाव जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला ही केला. या कामाचे बक्षीस म्हणूनच की काय तर एकनाथराव खडसे यांना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा सभागृहनेते पद, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते पद, महसूल मंत्री पद अशा प्रकारची विविध पद बहाल केली. याच बरोबर गिरीश महाजन यांना देखील वेळोवेळी पक्षातर्फे मोठी पदवी देण्यात आली. मात्र पुढे जाऊन गिरीश महाजन व खडसे यांच्यातले वाद हे मोठे होत गेले आणि अखेर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला.

असा जरी असला तरी अजूनही जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचाच बालेकिल्ला आहे. जळगाव जिल्ह्यात २ खासदार, ७ आमदार, अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.

भारतीय जनता पक्षा मागे स्थापने पासूनच जळगाव जिल्हातील मतदार ठाम पणे उभे आहेत. नेते आणि चेहेरे बदलतात पण जिल्हातील जनता हि भाजपच्या मागे ठामपणे उभी असते. म्हणूनच कि काय आत्ता पर्यंत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा जळगाव जिल्हात प्रचारासाठी दौरा केला आहे. भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील छोटे बडे नेते नेहेमीच जळगाव जिल्हात येत असतात. माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे एकदा म्हणले होते कि ‘जळगाव जिल्हा हा भाजप जिल्हा आहे. इथे फक्त भाजप इतकच नाव जरी घेतलं तरी लोक निवडून येतात.