मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसोबत पोलिसांनी केले हे…
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून देखील नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. दरम्यान, जळगाव शहरातील रामानंदनगर ठाण्याच्या पोलिसांनी माॅर्निंग वाॅक करताना शिक्षक, डाॅक्टर्स यांच्यावर केलेली कारवाईची चर्चा असतानाच आता पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांवर कारवाई करीत त्यांच्या पालकांना दंड ठोठावला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नव्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहे. अशात वारंवार समजावूनही नागरिक ऐकत नसल्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच सोबत आता शालेय विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बाहेती विद्यालयाच्या मैदानावर खेळताना गुरुवारी सायंकाळी या मुलांवर ही कारवाई करण्यात आली.
अकारण फिरणाऱ्यांबरोबरच पोलिसांनी सकाळी लवकर चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी संबंधिताना पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रकारही सुरू आहे. त्यामुळे आधीच गाजत असलेल्या या कारवाईत गुरुवारी सायंकाळी नव्या चर्चेची भर पडली. बाहेती महाविद्यालयाच्या मैदानावर खेळत असताना रामानंद पोलिस ठाण्याच्या फिरत्या पथकाला ही मुले दिसली. ती सर्व १६ ते १८ वयोगटाची होती, असे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी त्यात कमी वयाचीही मुले होती असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
दरम्यान, यावेळी एकूण ११ मुलांपैकी तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे पकडलेल्या आठ मुलांच्या पालकांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन त्यांना तिथे बोलावण्यात आले आणि त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला, असे रामानंद पोलिसांनी सांगितले.