⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

साकळी गावात पोलिसांनी थांबवला बालविवाह, वऱ्हाडींना समज

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील साकळी गावात सोमवारी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची तक्रार यावल पोलिसांकडे झाली होती. त्यानुसार पोलिसांनी बालसुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हा बालविवाह रोखला. वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून नोटीस द्वारे समज दिली.

साकळी येथे सोमवारी एक बालविवाह होणार आहे, अशी तक्रार रवींद्र शालिक सोनवणे (रा.देवगाव ता.चोपडा) यांनी केली होती. त्यात अल्पवयीन मुलगी ही किनगाव ता.यावल येथील असून तिचे वय १७ वर्षे ३ महिने आहे. या मुलीचा विवाह साकळी गावातील तरुणासोबत २३ मे रोजी नियोजित असल्याची ही तक्रार होती. या तक्रारीच्या पडताळणीसाठी यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांनी तातडीने बालसुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर बाल सुरक्षा अधिकारी अर्चना आटोळे, पर्यवेक्षक कल्पना तायडे, अंगणवाडी सेविका मंगला नेवे, हवालदार विजय पासपोळ, सिकंदर तडवी यांचे पथक साकळीत दाखल झाले. यावेळी बाल विवाहाची तयारी सुरू होती. पोलिस व बालसुरक्षा अधिकाऱ्यांनी हा बालविवाह रोखला. वधू-वरासह त्यांच्या कुटुंबीयांना यावल पोलिस ठाण्यात बोलावले. तेथे दोन्ही कुटुंबीयांना कायदेशीर नोटीस द्वारे समज देण्यात आली.