जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । कठोरे गावलगतच्या तापी नदी पात्रात चोपडा नगरपालिकेच्या नव्याने दुसऱ्या पाईपलाईन आणि पंपिंग स्टेशनच्या कामाला कठोरे येथील शेतकरी, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत यांचा विरोध कायम असताना १०० च्या वर पोलीसांचा फौजफाटा आणून चोपडा नगरपालिका आणि तहसीलदार यांचा गावकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला .त्यामुळे कठोरा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
कडेकोट बंदोबस्त लावून पाईपलाईनचे खोदकाम सुरू करण्याच्या कामाला सर्व कठोरे गावातील शेतकरी, ग्रामस्थ व तरुणांनी आणि विशेष करून महिलांनी खूप जोरदार विरोध केला. जोपर्यंत कठोरे ग्रामस्थांच्या मागण्या या लिखित स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत गावकऱ्यांचा विरोध कायम राहील, कठोरे ग्रामस्थांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर केलेल्या आहेत पण त्या पत्रांवर कोणताही निर्णय झालेला नसताना तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतीला कोणत्याही स्वरूपाची पूर्वपरवानगी न देता गावात १०० च्या वर पोलिसांचा फौजफाटा उभा करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
गावकऱ्यांचा वाढता विरोध बघून शेवटी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी फोनवर संपर्क साधून या विषयावर येत्या काही दिवसात गावकऱ्यांसोबत आणि चोपडा प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही दिली आणि त्यावर गावकऱ्यांनीही समर्थन दाखवले आणि त्यांनतरच सर्व फौजफाटा परत गेला.
संपूर्ण कठोरे गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकतेच दर्शन दाखवले या संपूर्ण तणावाच्या वातावरणात कोणतीही विपरीत घटना घडली नाही.
सदर कामास विरोध करण्यासाठी गावातील शेतकरी अशोक पाटील, पंकज पाटील, दिनेश पाटील, अरुण धनगर, गुलाब पाटील, समाधान पाटील, योगेश पाटील तसेच तरुण कार्यकर्ते दीपक पाटील, रत्नाकर पाटील, राज पाटील आणि पोलिसपाटिल, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विशेष करून महिला वर्ग आणि सर्व तरुण मंडळी उपस्थित होते. प्रशासनाकडून चोपडा तहसीलदार, नप मुख्याधिकारी, पोलीस प्रशासनाकडून मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.