जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्तनंतर घरी परतत असताना जळगावमधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून बारच्या बाहेर हाणामारी झाल्याच्या घटनेचे फोटो आणि नंतर कारने पळून जात असताना दुचाकीस्वाराला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) रोजी काढले. या प्रकरणात संबंधिताची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून निलंबन काळात धनगर यांना मुख्यालयात रहावे लागणार आहे.
काय आहे प्रकार?
रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाली होती. त्यानंतर कार काढताना दोन दुचाकींना धक्का देत त्या पाडल्या व काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले होते. हे पोलिस कर्मचारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील असल्याचे समोर आले असून, त्याविषयी अहवाल पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला. त्यानुसार पो.कॉ. संदीप धनगर हे मद्यपान केल्यानंतर वाद घालत असल्याने त्यांना दोघे जण समजवत होते, अशी माहिती मिळाली. गणवेशात मद्यपान केल्याचा ठपका ठेवून धनगर यांना निलंबित करण्यात येऊन प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.