⁠ 
शनिवार, मे 4, 2024

पोलीस देवदूत बनून आला, चिमुकल्याला जीवदान देऊन गेला

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । पोलिसांकडून सर्वसामान्यांची मदत करण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. अपघात, हाणामारीच्या ठिकाणी पोलीस तत्परता दाखवून मदत कार्य करीत असतात. रावेर शहरात असाच एक प्रकार समोर आला असून ऐनवेळी कुटुंबियांना रिक्षाने घरी पाठवत अनोळखी कुटुंबासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखविलेल्या तत्परतेमुळे १२ दिवसांच्या नवजात चिमुकल्याचे प्राण वाचू शकले आहे.

रावेर पोलीस स्टेशनला निलेश लोहार हे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. पोळ्याच्या दिवशी दिवसा काम केल्यानंतर ते दुपारी घरी पोहचले. मुलीची तब्येत ठीक नसल्याने ते पत्नीसह शहरातील माऊली हॉस्पिटलमध्ये पोहचले.

रुग्णालयात अगोदरपासूनच एक कुटुंब १२ दिवसाच्या बाळाला घेऊन उभे होते. बाहेर पाऊस कोसळत असल्याने कुटुंबीय प्रवासी रिक्षाने त्याठिकाणी पोहचले होते.

स्वतः च्या मुलाची तब्येत डॉक्टरांना दाखवून निलेश लोहार बाहेर पडले असता ते कुटुंबीय चिंताग्रस्त अवस्थेत बसले होते. १२ दिवसांचे बाळ तापाने फणफणत होते. बाहेर पावसाच्या धारा कोसळत होत्या. कुटुंबाची चिंता वाढत असल्याचे पाहून लोहार कुटुंबाने त्यांच्याशी चर्चा केली. आता आपण यांना मदत केली नाही तर.. असा विचार मनात आला आणि निलेश लोहार यांनी पत्नीला रिक्षाद्वारे मुलासह घरी रवाना केले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निलेश लोहार यांनी प्रकृती चिंताजनक असलेल्या १२ दिवसांच्या बाळाला व त्याच्या आजी व मातेला स्वतःच्या चारचाकी कारमध्ये बसवून ३० मिनिटात थेट बऱ्हाणपूर गाठले. रावेरच्या डॉक्टरांशी चर्चा केल्याप्रमाणे बऱ्हाणपूर येथे नेहरू रुग्णालयात बाळाला दाखल केले. बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला नवजात अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले. बाळ उपचारार्थ दाखल केल्यावर निलेश लोहार कुटुंबाशी चर्चा करून घरी यायला निघाले. बाळाच्या आजीने लोहार यांना गाडी भाड्यापोटी काही रक्कम देऊ केली परंतु लोहार यांनी सपशेल नकार देत स्वतःच्या खिशातून काढत २०० रुपये आजीला दिले.

बऱ्हाणपूर येथील नेहरू रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागात ५ दिवस उपचार घेतल्यावर बालकाला जीवदान लाभले आहे. शनिवारी बाळाची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्री येथील शकीला सुभेदार तडवी ही ‘त्या’ नवजात शिशूची माता आहे. बाळाची सुटका करण्यात आल्याने शकिला व सुभेदार तडवी या पती पत्नीने नीलेश लोहार यांना फोन करून आभार मानले.