पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांचा बडतर्फीचा आदेश रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । एमआयडीसी पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांचा बडतर्फीचा आदेश शासनाने रद्द केला असून सोमवारी ते पोलीस दलात पुन्हा रुजू झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊन काळात महामार्गावर अवैध दारूचा साथ पकडला होता. याप्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन पाटील, जिल्हा पेठचे संजय जाधव व मुख्यालयाचे मनोज सुरवाडे यांच्यावर मदत केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तिघांना बडतर्फ केले होते तर तालुका पोलीस ठाण्याचे भारत पाटील यांना निलंबित केले होते. शिरसाठ यांचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता. या कारवाई विरोधात पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्यासह पाटील, जाधव व सुरवाडे या तिनही कर्मचाऱ्यांनी शासनाकडे अपील केले होते. १७ जून २०२१ रोजी अंतिम सुनावणी होऊन ६ ऑगस्ट रोजी गृहविभागाने बडतर्फीची शिक्षा रद्द केली होती. दरम्यान, जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन कर्मचाऱ्यांना शासनाने १० सप्टेंबर रोजी सामावून घेतले होते. पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनाही शासनाने सामावून घेतले असून सोमवारी ते पोलीस दलात रुजू झाले.