⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

थर्टी फर्स्ट साजरी करताय, मद्य परवाना सोबत ठेवा.. जाणून घ्या प्रक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । राज्यात ओमायक्रॉनचे संकट असले तरी अनेकांनी ३१ डिसेंबर साजरे करण्याचे बेत आखले आहे. तळीरामांच्या पार्टीनंतर त्यांच्यावर नजर ठेवायला पोलीस प्रशासन तयारच आहे परंतु मद्य पिण्याच्या आणि जवळ बाळगण्याचा परवाना जवळ नसेल तर कारवाईचा झटका जोरदार बसू शकतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचा देखील मद्य परवाना दिला जात असून तो अवघ्या ५ रुपयात मिळू शकतो. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर काही मद्य विक्री दुकानदार दारूच्या बाटलीसोबतच आग्रहाने परवाना देत असल्याने मद्यपींचे अर्धे टेन्शन संपत आहे.

कोणत्याही प्रकारच्या मद्याची विक्री करण्यासाठी विक्रेत्याला परवान्याची गरज असते. त्याबरोबरच त्याच्याकडून मद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकाकडेही परवाना असणे बंधनकारक आहे. त्याबाबत व्यापक कारवाई होत नसली, तरी परवाना नसताना मद्य खरेदी करणे, जवळ बाळगणे आणि पिणे ही कृती बेकायदेशीरच ठरते. मद्य खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास ८० टक्के नागरिकांकडे कायदेशीर परवाना नसतो. मद्याचा परवाना काढणे म्हणजे समाजात वेगळीच प्रतिमा निर्माण होईल, या भीतिपोटी परवाना काढण्याकरिता कार्यालयात जाण्यास बहुतांश नागरिक संकोच करतात. मात्र, आता हा परवाना ऑनलाइन मिळत असल्याने अनेक जण हा पर्याय स्वीकारत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. संकेतस्थळावर नाव, मोबाइल क्रमांक आदी तपशील देऊन नोंदणी (लॉग इन) केल्यास ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येतो. ऑनलाइन सेवांमध्ये हव्या असणाऱ्या परवान्यावर क्लिक केल्यास अर्ज दिसतो. हा अर्ज भरण्यासाठी नाव, पत्ता आदी तपशिलांबरोबरच आधार क्रमांक आणि एका डिजिटल छायाचित्राची आवश्यकता असते. कायमच्या परवान्यासाठी एक हजार रुपये, वर्षभराच्या परवान्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज अपलोड केल्यानंतर सात दिवसांच्या आत परवाना ऑनलाइन पद्धतीनेच दिला जातो. आपल्या परवान्याचे काम कुठवर आले, हे तपासण्याबरोबरच ‘स्टेटस’ या पर्यायात परवाना उपलब्ध होतो. तो संबंधिताला डाऊनलोड करून घ्यावा लागतो. एक दिवसाचा परवानाही ऑनलाइन मिळू शकतो. मात्र, हा परवाना थेट परमीट रूम किंवा मद्य विक्रीच्या ठिकाणी पाच रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज थर्टी फर्स्टच्या पार्टीचा आनंद घेण्यासाठी मद्यपींना सोयीचा पर्याय म्हणून दुकानावर जाऊनच परवाना घेणं फायदेशीर आहे.

हे देखील वाचा :