⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | जळगावातील वाढत्या खुनाचे दोषी पोलीस!

जळगावातील वाढत्या खुनाचे दोषी पोलीस!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर तसे शांतताप्रिय शहर आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल खून झाले असून त्यासाठी पोलिसांना दोषी ठरविले जात आहे. खून आणि पोलीस यांचा फार जवळचा संबंध असतो पण तो कधी तर जेव्हा गुन्हेगारी क्षेत्रातील वाढती स्पर्धा, गॅंगवॉर, अवैध धंद्यातून खून झाला असेल तेव्हाच. शहरात गेल्या पंधरवड्यात झालेल्या खून प्रकरणांचा अभ्यास केला असता त्यात पोलिसांची चूक केवळ २० टक्केच दिसून येते. उलटपक्षी पोलिसांचे काम आणि तत्परता २०० टक्के असल्याचे समोर आले आहे. खून झाल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयितांना गजाआड केले असल्याने पोलीस दोषी असे म्हणणे सपशेल चुकीचे ठरेल.

जळगाव शहरात एका पाठोपाठ एक असे पंधरा दिवसात तब्बल ५ खून झाले आणि जळगाव पुन्हा जुन्या वाटेवर चालले कि काय अशी भीती जळगावकरांना वाटू लागली. अगोदरच उद्योग नाही, विकासकामे रखडलेली अशात खून वाढल्याने जळगाव बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते. जळगाव शहराची व्याप्ती कमी असली तरी काही परिसर प्रचंड दाटीवाटीचे आहेत. जळगाव शहरातील मोजक्याच परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात आणि ते परिसर देखील फारशे विकसित नसलेलेच परिसर आहेत.

जळगाव शहरात गेल्या महिन्याभरापासून सट्टा, पत्ता, जुगार अड्डे बंद आहे पण अवैध वाळू, अवैध गॅस भरणा, अवैध दारू विक्री, लाकूड चोरी, अंमली पदार्थांची विक्री मात्र सुरूच आहे. ग्रामीण भागात देखील अवैध धंदे जोरात सुरु आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या खुनांचा आणि अवैध धंद्यांचा काडीमात्र संबंध नाही. जिल्हा पोलीस प्रशासनाची गुन्हे शोधात दमदार कामगिरी असली तरी गुन्हेगार आणि अवैधधंदे चालक, मालकांशी असलेले पोलिसांचे संबंध मात्र घातक आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या खून प्रकरणात अवैध धंद्यांचा संबंध नसला तरी मयत किंवा संशयीत कुठेतरी अवैध धंद्याशी संबंधित आहे.

शहरात पंधरवड्यात पाच खून झाले त्यात समतानगर आणि शिवाजीनगर हुडकोत एकाच दिवशी झालेले दोन खून अनैतिक संबंधांशी संबंधित होते. गेल्या आठवड्यात हुडकोजवळ झालेल्या खुनाला क्षुल्लक कारण कारणीभूत होते तर शनिवारी मेहरूण तलावजवळ झालेल्या खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. धुलीवंदनाच्या दिवशी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेले प्राणघातक हल्ला प्रकरण नंतर खूनमध्येच रूपांतरित झाले. सर्व खून प्रकरणात पोलिसांचा कुठेच दोष नसला तरी काही तासात खून उघड करण्यात मात्र पोलिसांनी मोठी बाजी मारली आहे.

शहरात होणाऱ्या खुनाच्या मालिकेनंतर पोलिसांवर आरोप प्रत्यारोप करीत पोलिसांचा धाक संपला म्हणत नागरिकांनी पोलिसांनाच दोषी ठरविण्यास सुरुवात केली. पोलीस करीत असलेला तपास, काही तासात आरोपींच्या आवळलेल्या मुसक्या कुणीही लक्षात घेतल्या नाही. जिल्ह्यात किंवा आपल्या हद्दीत कुठेही कुणाचा जीव जावा अशी कोणत्याच पोलिसांची इच्छा नसते मात्र तरीही एखादा गंभीर गुन्हा घडल्यास पोलीस त्याच तत्परतेने तपासला लागतात आणि संशयिताला शोधून काढतात. गेल्या पंधरवाड्यातील उदाहरण लक्षात घेता स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि एलसीबीचे पथक संशयितांच्या तपासार्थ लागले आणि अवघ्या काही तासात त्यांना शोधून देखील काढले.

पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्यात तत्परतेने केल्या जाणाऱ्या तपासामुळे पुढील वाद देखील टाळतात. पोलीस टीकेचा कायम धनी होत असला तरी काहीवेळी पोलिसांना समजून घेत यांचे मनोबल उंचावणे देखील आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने सुरु केलेली गुन्हेगार दत्तक योजना आणि गुन्हेगारांची धिंड पद्धत प्रभावीपणे राबवली तर नक्कीच दहशत माजविणाऱ्यांचा धाक कमी होईल परिणामी इतर उगवते गुन्हेगार देखील शांत होतील. नुकतेच झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी संशयित व मयताचे अवैध धंद्यांशी किंवा जुन्या खुन्नसशी काही संबंध आहेत का हे तपासून पाहिल्यास पुढील ‘खून का बदल खून’ नक्कीच टाळता येईल.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.