गणपती बाप्पाच्या निरोपासाठी पोलीस व मनपा प्रशासन सज्ज
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता वाजत गाजत मिरवणुकीने झाली नाही. मात्र यंदा उत्सवावर कोणतेही संकट नसल्याने उत्सवाची सांगता वाजत गाजत होणार यात बिलकुलही शंका नाही. यामुळे या काळात कोणतेही अनिष्ट प्रकार घडू नयेत आणि गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. याचबरोबर मनपा प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच मेहरून तलावावर मनपा प्रशासन सज्ज झालं आहे. मेहरून तलावावर मनपाचे 25 जणांचे पथक दिवसभर तलाव परिसरात तैनात असणार आहेत. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणुकीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे यामुळे या ठिकाणीही पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.
मेहरून तलावावर घरगुती गणेशाचे विसर्जन होणार आहे. यासाठी मनपाने विशेष पथक त्या ठिकाणी ठेवले आहे. आरोग्य विभागाचे आठ पथक तर मुर्त्या विसर्जित करण्यासाठी समाजसेवी संस्था व इतर दीडशे जणांचे पथक असे पथक ठेवण्यात आले आहेत.
दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याने प्रशासनासह अनेक सामाजिक संस्थांकडून विसर्जन मार्गावर गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी 10 उभारले जाणार आहेत. गणेश भक्तांच्या सेवेसाठी 200 गट रक्षक विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच गणेश उत्सव महामंडळ शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस या पक्षांसह अनेक सामाजिक संघात संस्थांकडून स्वतःचे कक्ष उभारले जाणार आहेत.
घरगुती गणपती ज्या गणेश मुर्त्या पाच फुटाहून कमी असतील अशा गणेश मूर्तींचे विसर्जन गणेश घाटावर करण्यात येणार आहे. इतर मुर्त्यांचे म्हणजेच पाच फुटाहुन मोठ्या मुर्त्यांचे विसर्जन सेन्टेरेसा महाविद्यालयाजवळ करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत यंदा ऐंशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समाविष्ट राहणार आहेत असा अंदाज आहे. यंदा गणेश मंडळांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत विसर्जन होईल असा अंदाज आहे. निर्माल्य संकलनासाठी 15 घंटा गाड्या तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर मूर्ती संकलनासाठी विसर्जन मार्गावर दहा मूर्ती संकलन केंद्र असणार आहेत.