जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । दुर्गोत्सवात फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात मुस्लीम महिलांचे प्रतिक असलेले बुरखा हे वस्त्र परिधान करुन गरबा खेळणं चार जणांना महागात पडलं आहे. या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोहाडी रोड परिसरातील दुर्गोत्सव दांडीया कार्यक्रमात दोन पुरुष हे मुस्लिम महिलांचे बुरखा हे वस्त्र परिधान करुन दुस-या दोन पुरुषांच्या गळ्यात हात टाकून नृत्य करत होते. सर्वधर्म समभाव असा संदेश दर्शवण्यासाठी तरुणांनी परिधान केलेल्या या वस्त्रांच्या व्हिडीओचा समाजात चुकीचा संदेश पसरवला जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. काही समाजकंटक व्हिडीओचे स्क्रीनशॉट काढून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकाराची खात्री करुन माहिती जाणून घेतली.
संबंधीत कार्यक्रम आयोजकांना याबाबत सुचना देण्यात आल्या असून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दिल्या. समाजात शांतता टिकवून ठेवण्याचे सर्वांचे कर्तव्य असून प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन देखील डॉ. प्रविण मुंडे यांनी या माध्यमातून जनतेला केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करत आहेत.