जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । सर्वसामान्यांना आधीच महागाईची झळ बसत असताना आता त्यात सातत्याने होत असलेल्या पेट्रोल आणि डीझेलच्या दर वाढीने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सततच्या इंधन दर वाढीमुळे जळगावात पेट्रोल शंभरी पार गेले आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. तर डीझेलचा देखील दर प्रति लिटर ९० च्या वर गेले आहे.
रविवारी पेट्रोल १००.१० रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेल प्रति लिटर ९०.२० प्रति लिटर झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भावदेखील रविवारी वाढल्याने पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल ९१.५८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८०.९० प्रतिलिटर होते. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९४.०६ रुपये प्रति लिटर, १ मार्च रोजी ९८.६१ रुपये प्रति लिटर असे सातत्याने वाढत गेले. त्यासोबतच मे महिन्यात देखील पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. ४ मे रोजी ९७.८७ रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल आठवडाभरात ११ मेपर्यंत ९९.३५ प्रति लिटरवर पोहोचले. तेव्हापासून ही वाढ होत रविवार, १६ मे रोजी पेट्रोलने अखेर शंभर रुपयांचा आकडा पार करीत १००.१० रुपये प्रति लिटरवर ते पोहचले. यासोबतच डिझेलदेखील ९०.२० प्रति लिटरवर पोहोचले आहे.