जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । गेल्या मागील काही दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आज कच्च्या तेलाचे दर 118 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. सात वर्षांतील ही उच्चांकी पातळी आहे. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. मात्र त्यात कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. दरम्यान पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर इंधनाचे दर वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भारतात गेल्या 122 दिवसांपासून पेट्रोल,डिझेलचे (Petrol and Diesel) दर स्थिर आहेत. दरम्यान, आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109. 98 रुपये तर डिझेल 84. 24 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91.43 रुपये लिटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95. 41 रुपये एवढे असून, डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढू शकतात.