जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं सर्वसामन्यांच्या खिशाला चटके बसू लागले आहेत. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज बुधवारी पेट्रोल- डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली आहे.
आजच्या दरवाढीनंतर पेट्रोल ११७ रुपयांजवळ पोहोचले आहे. काल पेट्रोल ११६.२६ रुपये प्रति लिटर इतके होते. तर आज डिझेल १०० रुपयांजवळ पोहोचले आहे. काल डिझेलचा प्रति लिटरचा दर ९८.९५ रुपये इतका होता.
देशातील ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचे सत्र सुरूच आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल सहा रुपयांनी महाग झाले आहेत.
नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 115.04 रुपये तर डिझेल 99.25 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 115.69 आणि डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 115.09 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 114.71 आणि 97.46 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 114.96 रुपये लिटर आणि डिझेल 97.73 रुपये लिटर इतके आहे.