⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

इंधन दरवाढ थांबेना! 13 दिवसात पेट्रोल किती रुपयाने महागले? वाचा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून आत्तापर्यंत म्हणजेच 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महागले आहे. आज (रविवार) 03 एप्रिल रोजीही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. आजच्या दरवाढीने जळगावात एका लिटर पेट्रोलचा दर119 रुपयावर गेला आहे. तर डिझेलचा दर 102 रुपयावर गेला आहे.

भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 118 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल देखील 102 रुपये प्रति लिटरच्या पुढे विकले जात आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर आता 103.41 वर पोहोचला आहे, तर डिझेल 95 रुपयांच्या जवळ आहे.

मागील काही दिवसात वारंवार इंधन दरवाढ करण्यात आली. त्यामुळे भाजीपाला, किराणा माल, कडधान्ये, गॅसच्या जीवनावश्यक सर्व वस्तूंची भाववाढ होत आहे. महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य जनतेला गिळंकृत करीत आहे.