जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे.
जळगावमध्ये पेट्रोल १०५ रुपयाच्या वर गेले आहे. तर डीझेल ९६ रुपयाच्या वर गेले असून शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे. राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सततच्या भाव वाढीने जळगावमध्ये पेट्रोल इतिहासात पहिल्यांदा १०० च्या वर गेले आहे.
मागील दोन महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल ३२ वेळा दरवाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी ८ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज सोमवारी कंपन्यांनी दरवाढीला तूर्त विश्रांती दिली. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत. आज जळगावमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०५.७४ रुपये आहे. तर डीझेल ९६.०७ प्रति लिटर रुपये आहे.
जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०५.७४ रुपये पर्यंत आहे. गेल्या २७ दिवसात पेट्रोल तब्बल ४ रुपयाहून अधिकने वाढले आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९६.०७ प्रति लिटर झाले आहे. डीझेलमध्ये देखील गेल्या २७ दिवसात ४ रुपयाहून अधिकने वाढ झाली आहे.
देशातील इतर बड्या शहरातील दर?
दरम्यान, आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०४.६२ रुपयांपर्यंत वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.५२ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा ९९.५५ रुपये इतका भाव वाढला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९८.३६ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०६.७७ रुपये आहे.
मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. जाणकारांच्या मते, इंधन दरवाढीचा सपाटा असाच सुरु राहिला तर लवकरच मुंबईत डिझेल शंभरी गाठेल. दिल्लीत डिझेल ८८.९५ रुपये आहे. चेन्नईत ९३.१५ रुपये आणि कोलकात्यात ९१.८० रुपये डिझेलचा भाव आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.६७ रुपये झाला आहे. आजच्या घडीला देशातील सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.