⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अच्छे दिन ! पाच दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज (शनिवार) 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या आठवड्यातील पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. अशाप्रकारे पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनंतर जळगावमध्ये (Jalgaon) पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११४ रुपयाजवळ पोहोचला आहे. तर डिझेल ९७ रुपयांवर पोहोचले आहे.

पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या किमती (Fuel Price) वाढवण्यात आल्या आहेत. देशात सर्व गोष्टींच्या किंमती गगनाला भीडत चालले आहे. यामुळे सर्वसामान्य होरपळून निघत आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये अनेक जण बेरोजगार झाले. त्यात महागाईने कळस गाठला आहे. यात सर्वसामान्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर
नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 113.35 तर डिझेल 96.70 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 114.17 आणि डिझेल 98.35 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 112.68 तर डिझेल 95.46 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 112.37 आणि 95.13 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 112.22 रुपये लिटर आणि डिझेल 95.02 रुपये लिटर इतके आहे.