⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

लोकांना मला बदनाम करायला आनंद मिळतो – आमदार भोळे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । काही लोकांना मला बदनाम करायला आनंद मिळतो, त्यांनी आनंद घ्यावा अश्या शब्दात आमदार राजूमामा भोळे यांनी ते खडसेंना मतदान करणार या बातम्या पेरणाऱ्यांना टोला लगावला. यावेळी ते म्हणाले कि, मी भाजपचा पदाधीकारी आहे. मी भाजपासाठी गेले २५ वर्ष काम केले आहे. यामुळे मला अश्या बातम्यांचा फरक पडत नाही. कितीही अफवा पसरवल्या तरी मी भाजपचाच आहे.

विधानपरिषद निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे आता नक्की झाले आहे. त्यात एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकिट दिल्याने जिल्ह्यासाठी हि निवडणूक महत्वाची झाली आहे. जिल्हावासियांनाही यात मोठा रस वाटत असल्याने आता पुढे काय होते ? हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. या निवडणुकीत जळगाव शहराचे आमदार तथा जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश (राजूमामा) भोळे हे नाथाभाऊंचे जुने समर्थक असल्याने ते त्यांना मतदान करणार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भातील वृत्त प्रकाशित होताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, या प्रकरणी स्वत: आमदार भोळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाचा गेल्या २५ वर्षांपासून कार्यकर्ता आहे. भाजपने मला आमदार केले आहे. पक्ष सांगेल त्यांनाच मी मतदान करणार आहे. मी एकनाथराव खडसे यांना मतदान करेल हा दावा खोटा असून मला बदनाम करायला लोकांना आनंद मिळतो. दरम्यान, एकनाथराव खडसे यांना मी पक्षाचा आदेश टाळून मतदान करूच शकत नाही. यामुळे या प्रकरणी आमदार भोळे यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडली.