⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

धानोऱ्यात वाढले डेंग्यू, मलेरियासह टायफाइडचे रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे मलेरिया, टायफाइडसह डेंग्यू आजाराने थैमान घातले असून खासगी रुग्णालये फुल्ल झाले आहेत. अनेक डेंग्यूच्या रूग्णांवर जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असतांनाही ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

धानोरा (ता.चोपडा) येथे डेंग्यू, मलेरियासह टायफाइडच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे खाजगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. परिणामी काही रुग्णांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले असून तेथील खाजगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दहा ते बारा रूग्णांना डेंग्यू सदृश्य आजार असल्याने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात डेंग्यूची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असूनही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आजपर्यंत काहीएक उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

फवारणीची मागणी
धानोऱ्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत असूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी गावात येण्याची तसदी घेतलेली नाही. गावात हिवताप तपासणी मोहीम राबवून डासांचे नियत्रंण करण्यासाठी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ग्रामपंचायतीकडून स्वच्छता नाही
गावात डेंग्यू सदृश्य आजाराने डोकेवर काढले असूनही ग्रामपंचायत प्रशासनातर्फे आजपर्यंत काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून डेंग्यू आजार जोर पकडत आहे. तरीही गावात ग्रामपंचायतकडून स्वच्छता मोहीम अथवा मच्छर प्रतिबंधात्मक फवारणी केली गेलेली नाही.

माहिती कळवलेली नाही
गावात डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण असल्याचे समजले. त्यामुळे गावात डेंग्यू अळी तपासणी मोहीम राबविण्यात आली व नागरीकांना कोरडा दिवस पाळण्याबाबत सूचना दिल्या. डेंग्यू असल्याने रूग्णांवर जळगांव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असले तरी आजपर्यंत कोणीही आमच्यापर्यंत डेंग्यू झाले असल्याची माहिती कळवली नाही.
– डॉ. उमेश कवडीवाले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, धानोरा