⁠ 
सोमवार, मे 6, 2024

पालकांना ‘माय’ मराठीचा विसर : मराठी शाळांमध्ये केवळ ४० टक्के प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । यंदा ९० टक्के इंग्रजी माध्यमाचे प्रवेश झालेले असताना मराठी शाळांचे प्रवेश मात्र ३० ते ४० टक्केच झाले आहेत. एकीकडे सरकारसह अनेक संस्था माय मराठीचे शिक्षण देणाऱ्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. दुसरीकडे मात्र मराठी माध्यमाच्या बालवाड्या, पहिली व पाचवीसाठी विद्यार्थी मिळत नसल्याची स्थिती आहे.

पहिलीपासून विद्यार्थ्यांना फक्त गणित हाच विषय इंग्रजीमधून शिकवला जातो. मात्र सहावीपासून विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय इंग्रजीत असल्याने विद्यार्थ्यांना अडचण नको याकरिता पालक पाचवीपासूनच मराठी माध्यमात प्रवेश घेण्याऐवजी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात. आता तर बालवाडीपासूनच सेमी इंग्रजीला पसंती दिली जात आहे. प्रत्येक शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू झाले असून, मराठी माध्यमाचेदेखील शिक्षण दिले जाते आहे. मात्र मराठीला विद्यार्थीच येत नसल्याने यंदा शिक्षकांना सर्व वर्ग हे सेमी इंग्रजीचे करावे लागले आहेत. तर काही शाळांमध्ये मराठीच्या वर्गात १५ ते २० मुलेच शिक्षण घेत आहेत.प्रत्येक वर्गात साधारण ५० मुले शिक्षण घेत असून, एका इयत्तेच्या तीन तुकड्या असतात. दोन सेमीच्या तर एक मराठी माध्यमाची. एका शाळेत सेमीच्या दोन्ही तुकड्यात प्रवेश देण्यात आला तर मराठीच्या तुकडीत मात्र दोनच विद्यार्थी प्रवेशित झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कोरोनाकाळात शिक्षण क्षेत्राची कोंडी झाली आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा अजूनही तग धरून आहेत. पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढताे आहे. हे लक्षात घेऊन ९०% शाळांनी सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू केले. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना असूनदेखील सध्या मराठी शाळा टिकवण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागताहेत. तरीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मराठी शाळा टिकण्यासाठी शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. पालक शाळेत प्रवेशाची माहिती घेण्यासाठी येतानाच सुरुवातीला सेमी इंग्रजी आहे का? असा प्रश्न विचारताहेत. यावरून इंग्रजी माध्यमाकडे मराठी कुटुंबांचाही ओढा वाढत असल्याचे दिसते.