जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर ती दुर्दैवी आहे. त्या मोदींना आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा अर्थही तसा घेऊ नये, अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.
मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं होत जे खूप चर्चिल जात आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी खडसे असेही म्हणाले कि, अनेक वर्षे ज्यांनी उभं आयुष्य पक्षासाठी वेचलं, या काळात खूप मेहनत केली, परिश्रम घेतले, त्या परिसरामध्ये पक्षाला चांगले दिवस गोपीनाथ मुंडे यांनी आणून दिले. त्यामुळे अशा गोपीनाथा मुंढे यांच्या कन्या असल्याने स्वाभाविकच पक्षाकडून त्यांना मान सन्मान मिळायला पाहिजे. पक्षामध्ये चांगलं स्थान मिळायला पाहीजे मात्र ते होताना दिसत नाहीये असे खडसे म्हणाले.
भाजपकडून पंकजा मुंडे यांची उपेक्षा होत आहे. पंकजा मुंडे यांना एवढ्या वर्षात ना राज्यसभेची उमेदवारी मिळाली, न विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. ही पंकजा मुंडे यांची उपेक्षाच असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. पंकजा मुंडे यांना असं वाटतं, की अंतर्गत वादामुळेच पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पक्षामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखविली आहे. असेही खडसे म्हणाले.