जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाडळसे निम्न तापी प्रकल्पाची पाहणी केली असून यावेळी पाडळसे प्रकल्प कधी पूर्ण होणार, याबाबत अजित पवार यांनी डेडलाईन दिली आहे. जून 2025 पर्यंत पाणी अडविण्याचे नियोजन असून या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही अजित पवारांनी आज दिली.

या तालुक्यांना प्रकल्पाचा लाभ होणार
दरम्यान, २८ वर्षे हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. आता जून 2025 पर्यंत या प्रकल्पात पाणी अडविण्याचे नियोजन आहे. यामुळे जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, धरणगाव व धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यास या प्रकल्पाचा लाभ होणार होईल.
एक लाख हेक्टर क्षेत्र भिजणार
पाडळसे निम्न तापी प्रकल्पामुळे जळगाव व धुळे जिल्ह्यांतील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. केळी, भाजीपाला, फळे व कापूस पिकाच्या शेतीला मोठा आधार या प्रकल्पामुळे होऊ शकतो
पाडळसे निम्न तापी धरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये
अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प सन 1999 पासून बांधकामाधीन आहे. एकूण लाभक्षेत्र 43,600 हेक्टर इतके नियोजित असून त्यासाठी 17.01 TMC पाणी वापरास मंजुरी प्राप्त आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टण्यात १०.४० TMC पाणीवापर करुन 25,657 हेक्टर लाभक्षेत्र तयार होणार आहे.
प्रकल्पाच्या टप्पा 1 साठी 2,472 हेक्टर भूसंपादन आवश्यक असून त्यापैकी 770 हेक्टर संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. तसेच 5 गावे पूर्णतः व 6 गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहेत. त्यापैकी 3 गावांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली असून 1 गावाची प्रक्रिया प्रगतीत आहे. 7 गावांसाठी जागा निश्चिती करिता कार्यवाही प्रगतीत आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत एकूण 763 कोटी रूपये खर्च झाले आहेत. या आर्थिक वर्षात 100 कोटी रूपये एवढी तरतुद आहे. या प्रकल्पाला नुकतीच 4,890 कोटी रूपये एवढ्या अद्यावत किंमतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.