चाळीसगाव-कन्नड मार्गावर दरोडा ; पाचोऱ्याच्या डॉक्टर कुटुंबावर हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला

ऑक्टोबर 27, 2025 11:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून यातच दरोड्याच्या घटना देखील वाढताना दिसत आहे. अशीच एक दरोड्याची घटना चाळीसगाव-कन्नड मार्गावर घडली. ज्यात पाचोरा येथील डॉक्टर परिवारावर दरोडेखोरांनी हल्ला करून सोन्याचे दागिने, मोबाइल, लॅपटॉप व रोख रक्कम असा सुमारे १ लाख २० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आलीय.

crime chalisgaon 1 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. योगेश नेताजी पाटील (वय ३८ रा. महावीर पार्क, पाचोरा) हे आपल्या कुटुंबासह पुण्याकडे जात होते. त्यांच्या सोबत पत्नी नुतन योगेश पाटील, भाऊ दिनेश पाटील, दाजी भरत पाटील व चालक भूषण पाटील हे होते. कारने (क्र. एम.एच-१९, सी. व्ही-६४८६) सर्व पाचोऱ्याहून पुण्याकडे निघाले होते. पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-कन्नड मार्गावर रांजनगाव फाट्याजवळील नायरा पेट्रोलपंपाजवळ गाडीखाली काहीतरी अवजड वस्तू लागल्याचा आवाज आला.

गाडी थांबवल्यानंतर तपासणी करताना सात ते आठ अनोळखी इसम हातात लाकडी काठ्या घेऊन त्यांच्या अंगावर धावून आले. सर्वांनी काळ्या कपड्यांमध्ये व चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते. त्यांनी डॉक्टर पाटील आणि त्यांच्या भावासह इतरांना मारहाण करत सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने, मोबाइल, लॅपटॉप व रोख रक्कम असा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर पसार झाले.

१ लाखांचा ऐवज लुटला
तक्रारीत एक लाख २० हजारांचा ऐवज लुटुन नेल्याचे म्हटले आहे. यात ९ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ४५ हजार), डेल कंपनीचा लॅपटॉप (२० हजार), आयफोन-१३ मोबाइल (३० हजार), रेडमी व वनप्लस मोबाइल (१५ हजार), रोख रक्कम ९ हजारांचा समावेश आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now