संतापजनक : रस्त्यांवरील चिखलामुळे नागरिकांचे हाल मात्र प्रशासन गप्प
जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । शहरातील सत्यम नगर, गजानन नगर कानळदा रोड परिसरात सांड पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पाणी साचले असून रस्त्यांवर चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर निघता येत नाहीये. अश्यावेळी प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नसल्याने नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी महापौर, आयुक्तांना निवेदन देवून सांडपाण्याची व्यवस्था व रस्ते तयार करण्याची मागणी केली.
तसेच रस्त्यांवरील चिखलामुळे मुलांना शाळेत जाता येत नसून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने मागण्यांची दखल न घेतल्यास सर्व नागरिकांना सोबत घेऊन मनपा समोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील गट क्र. ३२६ मध्ये असलेल्या सत्यम नगर, गजानन नगर व कानळदा रोड परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्याच प्रमाणे याभागात सांड पाण्याचा निचरा व्हावा यासाठी व्यवस्था नसल्यामुळे घरांच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी साचले आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील या नागरी समस्यांकडे कोणीही लक्ष देत नसून नगरसेवक या भागात फिरकायला देखील तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच चिखलामुळे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेच्या व्हॅन या भागात येवू शकत नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने या भागातील रस्ते व सांडपाण्याची व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदनावर विजय कोळी, उषा वाघ, सचिव पाटील, एस.झेड. पाटील, विजय इंगळे, संजय इंगळे, प्रकाश पाटील, सुवर्णा कोळी, किरण इंगळे, विदया पाटील, नरेंद्र कुमावत, किशोर कोळी, चंद्रकांत सांखला, शितल सुसाने, अशोक ठोसर, सोनाली व्हाकार, प्रविण बडगुजर, अजय सोनवणे, निलेश पाटील, शितल पाटील, विजय दुसाने, जयश्री नाझरकर, शशिकांत पाटील, गोपाल जोशी, दिव्या चौधरी, सुरेखा गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.