राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे ८ एप्रिल पासून आयोजन
क्रीडा उत्सव स्पर्धेत विजेत्यांसाठी १० लाखांची बक्षिसे
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना, जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे दि ८ ते १३ एप्रिलदरम्यान सहादिवसीय राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.क्रीडा उत्सव स्पर्धेत विजेत्यांसाठी १० लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
सदर स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी भारतभरातील नावाजलेले १० पुरुष व महिला ग्रँडमास्टर, १३ आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेमार्फत चार अधिक एक राखीव संघ पाठवले जाणार असल्याची माहिती संघटने कडून देण्यात आली. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी ९० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद वाढीव वेळ राहणार आहे. ही स्पर्धा जळगावातील प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची १० लाखांची बक्षिसांची रक्कम विजेत्या संघांना प्राप्त होणार असून पुरुष व महिला गटात समसमान अशी ५ लाखांची रोख बक्षिसे वितरित केली जातील. स्पर्धा आयोजन समितीचे चेअरमन अशोक जैन, संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया यांच्या मार्गदर्शनात जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, विवेक आळवणी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सदस्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
मोबाइल प्रीमियर लिग फाउंडेशन (एमपीएल) व स्पोर्ट्स अँथॉरिटी ऑफ इंडिया (साई) या संस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाशी करारबद्ध असून या स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टिम लि. अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारले असल्याचे पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, सहसचिव शकील देशपांडे, जैन अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशापांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे उपस्थित होते.
पुरुष गटात एलआयसी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आरएसपीबी टीम, महाराष्ट्रासह तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे. तर महिला गटात महाराष्ट्रासह आंध्र, गुजरात, ओडिशा, बिहार, हिमाचल प्रदेश आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघ स्पर्धेत सहभागी होत आहे.